भंडारा पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’
दोन तासांत ४४८ कारवाया, ३७८ गुन्हेगारांची तपासणी
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी भंडारा पोलिस दलाने दि. २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ या दोन तासांत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत ५० अधिकारी व ३१२ अंमलदार सहभागी झाले होते.
ऑपरेशन दरम्यान जिल्हाभरात दारूबंदी कायद्यांतर्गत २१, जुगार कायद्यांतर्गत ०४, मोटार वाहन कायद्यांतर्गत ४०२, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणी २० व अवैध रेती वाहतुकीवर १ अशा एकूण ४४८ कारवाया करण्यात आल्या. याशिवाय कारागृहातून सुटलेले, अभिलेखावरील व माहितीगार असे एकूण ३७८ गुन्हेगारांची घरे तपासण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ९८४ वाहनांची तपासणी करण्यात आली. कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारांवर वचक निर्माण करत स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात आले.
“जिल्ह्यातून अवैध धंदे व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. अवैध धंदे करणारे, अंमली पदार्थ सेवन, बाळगणे व विक्री करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ माहिती द्यावी.”
“माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. हे ऑपरेशन पूर्णपणे शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरूच ठेवून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घातला जाईल, असा इशारा पोलिस दलाने दिला आहे. दहशतवादी व नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठीही हे ऑपरेशन महत्त्वाचे ठरले.”
—नुरुल हसन, जिल्हा पोलीस अधीक्षक








