अखेर मोहाडी सभापती, उपसभापतींचा अविश्वास ठराव पारित
दहा विरुद्ध तीन मताने ठराव पारित; सभापती गैरहजर
दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- मोहाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती विरुद्ध अविश्वास प्रस्तावच्या फैसला आज झाला. त्यात सभापती व उपसभापती विरुद्धच्या अविश्वास प्रस्ताव दहा विरुद्ध तीन मताने पारित झाला. विशेष म्हणजे, या अविश्वास ठरावाच्या वेळी सभापती जगदीश शेंडे गैरहजर.
आपल्या पक्षाच्या विरुद्ध बंड करणाऱ्यांनी एकत्र येऊन तसेच सहा भाजपाच्या पंचायत समिती सदस्यांच्या सोबत एकत्रित येऊन ४ जून रोजी अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर सगळ्यांच्या नजरा या विश्वास प्रस्तावाकडे लागलेल्या होत्या. २१ दिवसानंतर सरळ मोहाडीच्या भूमीवर पाय ठेवणाऱ्या व राजकीय पर्यटनावरून परत आलेल्या दहा सदस्यांनी सरळ पंचायत समितीच्या सभागृहाच्या दालनात दोन वाजता च्या पूर्वी प्रवेश केला. तसेच सत्ता पक्षाचे तीन सदस्य ही सभागृहात हजर झाले. दोन वाजता सभेला सुरुवात झाली. काही वेळातच अविश्वास ठरावाची कार्यवाही तुमसरचे उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी गणेश दिघे यांनी सुरू केले.
सभापती व उपसभापतींच्या अविश्वासाच्या ठरावावर हात उंच करून मतदान घेण्यात आला. यावेळी सभापती व उपसभापतींच्या विरुद्ध बाजूने दहा हात वर झाले. तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध फक्त तीन हात उंच झाले. निकाल जाहीर केला.
यावेळी व्यासपीठावर मोहाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, सहाय्यक गटविकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे यांनी अविश्वास ठरावाची कार्यवाही करण्यास सहकार्य केले. पिठासीन अधिकाऱ्यांनी अविश्वास ठरावाचा निकाल जाहीर केला. त्यानंतर लगेच दोन वाजून पंचवीस मिनिटांनी सत्ता पक्षाकडे व ठरावाच्या विरुद्ध मतदान करणारे पंचवीस समिती सदस्य हे बाहेर सभागृहाच्या बाहेर निघून गेले. अविश्वास ठरावाची पूर्ण कार्यवाही झाल्यानंतर पंचायत समितीच्या आवारात ठरावाच्या बाजूने असलेल्या दहाही सदस्यांनी विजयी मुद्रा करून एकच जल्लोष केला.
अविश्वास ठरावाच्या बाजूने सभापती व उपसभापतींच्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने बाणा सव्वालाखे, उमेश भोंगडे, आशा बंड्रे, वंदना सोयाम, विठ्ठल मलेवार, कैलास झांजड, दुर्गा बुराडे, विश्मा सेलोकर, छाया तडस व कौतिका मंडलेकर हे दहा पंचायत समिती सदस्य होते. तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध रितेश वासनिक, देवानंद चकोले, प्रीती शेंडे हे पंचायत समिती सदस्य होते.
कडेकोट बंदोबस्त
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मोहाडीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांनी पंचायत समितीच्या चारही बाजूला नाकाबंदी केली होती. भंडाराहून राखीव पोलीस दल पाचारण करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त व पोलीस तैनात होते.
अविश्वास ठरावाच्या प्रसंगी यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली नाही. मात्र आवाराच्या बाहेर ठीक ठिकाणी तुरळक प्रमाणात गर्दी केली होती. सत्ता पक्षाच्या नेतृत्वाने अविश्वास प्रस्ताव बारगळावा यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु, विविध आयुधांचा वापर करूनही निराशा हाती आली. सत्ता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चेहऱ्यावर ती उदासती दिसून आली.








