मातोश्री पांदन रस्ता खडीकरण कामात भ्रष्टाचार
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- मोहाडी तालुक्यातील एकलारा (रीठी) येथे सुरू असलेल्या मातोश्री पांदन रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या (बांधकाम विभाग) शाखा अभियंत्याचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. या पांदन रस्ता खडीकरण कामाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी सुनिल मेश्राम यांनी केली आहे.
ह्या रस्त्याचे काम रोजगार हमी योजने अंतर्गत असून या कामावर देखरेख जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आहे. हे काम अंदाजे २४ लाख रुपये अंदाजपत्रकाचे असून या पांदन रस्त्याचे काम वरठी येथील ठेकेदार करीत आहे. हा ठेकेदार अधिक पैसा कमविण्याच्या नादात अंदाजपत्रकाला न जुमानता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करीत आहे. कामावर अशिक्षित, अडाणी सुपरवायझर ठेवून त्यांच्या देखरेखीखाली कामात अनियमितता केली जात आहे. जुन्या पांदन रस्त्यावर कुठलीही खडी न पसरविता पातळ-पातळ ८० एम एम गिट्टी पसरविली जात आहे. त्यावर एकदम पातळ माती, भिस मिश्रित मुरुम पसरविला जात आहे. पाणी मारून रोडरोलरने दबाई केली जात नाही. प्रथम थर कमी जाडीचा असल्याने पुढचे थरही कमी जाडीचे असतील असा आरोप तक्रारदाराने केला आहे. या पांदन रस्ता कामामध्ये निर्धारित तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आले नाही. यामुळे हा रस्ता सहा महिन्यांतच उखडून गिट्टी बाहेर येणे सुरू होईल. या रस्त्याची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करून सदर रस्त्याच्या कामाचे देयके थांबविण्यात यावे.
शासन दरवर्षी शेतावर जाणारे पांदन रस्ते मजबूत व्हावे म्हणून करोडो रुपये खर्च करते. मात्र ज्या यंत्रणेकडे हा पैसा खर्च करण्यासाठी येते, त्या यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी ठेकेदारांना घेऊन अर्धा अधिक पैसा स्वतःच्या खिशात घालतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी तयार होणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे होत आहेत. मागच्या वर्षी तयार करण्यात आलेले पांदन रस्ते संपूर्ण खराब झाले असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. एकलारा (रीठी) येथे सुरू असलेल्या मातोश्री पांदन रस्ता कामाची तात्काळ चौकशी करून देयके थांबविण्याची मागणी शेतकरी सुनिल मेश्राम यांनी कार्यकारी अभियंता जि. प. यांच्याकडे केली आहे.








