भंडारा नगर परिषदेची ट्युशन क्लासेस व व्यावसायिक इमारतींवर धडक कारवाई
अग्निशमन यंत्रणा तपासली, संबंधितांना नोटीस पाठविले
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- नगर परिषद भंडारा क्षेत्रात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असलेल्या ठिकाणी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी अनपेक्षितपणे भेट देऊन व्यावसायिक इमारती व ट्युशन क्लासेसची तपासणी केली. यावेळी बांधकाम परवानगी, अग्निशमन परवानगी तसेच इतर आवश्यक परवाने घेण्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले.
मुख्याधिकाऱ्यांनी ‘ट्युशन’मधील मलन टॉवर, स्पार्क क्लासेस, गिर्हेपुंजे इंग्लिश क्लासेस, महाळकर फिजिक्स क्लासेस, आयडियल मस्त अकॅडमी, कॅटलायझर क्लासेस, शिक्षा क्लासेस आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे की नाही, तसेच सदर इमारत अग्निशमनदृष्ट्या योग्य व अधिकृत आहे का, याची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारत मालकांना नोटीस पाठविण्यात आले आहेत. नोटीसात सात दिवसांच्या आत आग प्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६, तसेच बांधकाम परवानगीनुसार उपाययोजनांचे अनुपालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, उच्चदाब विद्युत वाहिनीखाली सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबतही मुख्याधिकारी यांनी नगर रचनाकार पवन कनोजे, अग्निशमन अधिकारी समीर गणवीर व इतर कर्मचाऱ्यांच्या समक्ष मौका चौकशी केली. चौकशीदरम्यान सदर बांधकाम विनापरवाना असल्याचे आढळून आले. याप्रकरणी मालमत्ता धारकांना नोटीस देऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषदेने उचललेल्या या पावलाचे पालकांकडून स्वागत होत आहे.








