जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- खात रोड परिसरात जुन्या वादातून चार जणांना मारहाण करून सोन्याचा गोफ जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये मयंक रविंद्र तिवारी (२५) रा. मोठा बाजार, रितेश केळवदे रा. कस्तुरबा गांधी वार्ड व चेतन तिघरे रा. संभाजी वार्ड यांचा समावेश आहे.

दि. २३ जून २०२६ रोजी खात रोड परिसरात पूर्वीच्या वैमनस्यातून झालेल्या वादातून या तिघांनी चौघांना मारहाण करून सोन्याचा गोफ जबरीने हिसकावून नेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. संजय गायकवाड यांना विशेष पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पो. उप. नि. श्रीचंद गंगवानी यांच्या नेतृत्वाखाली पोहवा प्रदिप डहारे, सतिश देशमुख, किशोर मेश्राम, पो. अंमलदार चेतन पोटे, शुभम ठाकरे, सचिन देशमुख, चालक पो. अंमलदार आशिष तिवाडे, कौशिक गजभिये यांचे पथक तयार करण्यात आले. दि. २३ जून रोजी पथकाने वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाजवळ सापळा रचून तिन्ही आरोपींना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी जुने भांडण कारणीभूत ठरून मारहाण करून सोनसाखळी बळजबरीने हिसकावल्याची कबुली दिली.

आरोपींकडून गुन्ह्यात हिसकावलेला १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल क्र. एमएच-३६/डब्ल्यु-०४२४ असा एकूण ७६ हजार १०० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *