महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे : प्राचार्य राहुल डोंगरे

न. प. तुमसर येथे आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन निमित्ताने प्रतिपादन

दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर:- आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन हा केवळ एक दिवस नसून जीवनातील कठीण वाटांवर स्वतःच्या हिमतीने चालणाऱ्या लाखो महिलांच्या संघर्ष, जिद्द आणि यशाचा गौरव करण्याचा दिवस आहे. विधवा, घटस्फोटित किंवा अविवाहित महिला समाजातील अनेक आव्हानांना सामोरे जात असतात. मात्र संकटांनी खचून न जाता त्या आपल्या कर्तृत्वाने नवी ओळख निर्माण करतात. असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.

नगरपरिषद तुमसरच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण विभागाच्या उपसभापती शाहीन झाकीर तुरक उपस्थित होत्या.

प्राचार्य राहुल डोंगरे पुढे म्हणाले की, आजची स्त्री कोणाच्याही आधाराची वाट पाहत नाही. तर स्वतःच इतरांसाठी आधारवड बनत आहे. शिक्षण, व्यवसाय, शेती, उद्योग, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेवून आत्मविश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन म्हणजे एकटेपणाचा नव्हे, तर आत्मसामर्थ्याचा उत्सव आहे. स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते. तेव्हा ती केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाही तर समाजालाही नवी दिशा देत असते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मीरा भट, नगरसेविका सुनीता तिबुडे, स्मिता बोरकर, वैशाली हिंगणे, सोनिया धुर्वे, नलिनी डिंकवार, स्वाती सेलोकर, रेखा चकोले तसेच नगरसेवक नितीन धांडे उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक नितीन धांडे, नगरसेविका सोनिया धुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या मीरा भट यांनी एकल महिला असणे ही कमजोरी नसून ती आत्मनिर्भरतेची ओळख आहे. समाजाने त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तर सन्मानाने पाहण्याची गरज असल्याचे आहे. असे मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक प्रकल्प अधिकारी यमुना नागदेवे यांनी केली. सूत्रसंचालन रितू मोहनकर (सीआरपी) यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनिता कटारे (सीआरपी) यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती कावळे, प्रीती भोयर, वनिता बेहरे, आरती झुरमुरे, कविता नागमोते, नलिनी खोब्रागडे, रोशनी सार्वे, लीना समरीत, माधुरी बिसने, वैशाली बनसोड आणि रेखा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजित कार्यक्रमाचे नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे, उपाध्यक्ष इंजि. सचिन बोपचे, महिला व बालकल्याण सभापती शीतल पेठे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *