ग्रामपंचायत सिहोराचा नाली सफाई अभियान धडाक्यात

जनतेने सहकार्य करावे – सरपंच रंजू तुरकर

दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा:- पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत सिहोराच्या वतीने नाली सफाई अभियान धडाक्यात सुरू आहे. नाली सफाई करणाऱ्या कामगारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ग्रामवासियांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत सिहोराच्या सरपंच रंजू तुरकर यांनी केले आहे.

सात ते आठ हजार लोकसंख्या व लाखो रुपयाच्या घरात उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १३ असून वॉर्डांची संख्या पाच आहे. पावसाळ्याचे दिवस व जनतेचे आरोग्य लक्षात घेता ठीक ठिकाणी कचरा साचून व तुडुंब भरलेल्या सर्व वॉर्डांच्या नाली सफाईचा अभियान मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू आहे. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत नालीवर तात्पुरते अतिक्रमण करून रेती, गिट्टी, मलमा, लाकडे व जनावरे बांधून अतिक्रमण केले असेल ती जागा मोकळी करावी, जेणे करून नाली सफाई करणाऱ्या मजूर वर्गाला अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तसेच ग्रामवासीयांनी सुद्धा नाली सफाई कामगारांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गावात सुरू असलेल्या नाली सफाईच्या कामावर ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा लक्ष ठेवावे व आप आपल्या वॉर्डाच्या नालीची सफाई कामगाराकडून करवून घ्यावी. ज्या वॉर्डात नाली सफाईच्या कामात अडचण येत असेल ते काम ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व ग्रामवासियांच्या मदतीने ती अडचण दूर करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्याचे पाणी गावातील कोणत्याही नालीत व पुलीयात साचून राहणार नाही याची सुद्धा दखल घेण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *