भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचा दणदणीत विजय

तारांकित मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण संपन्न
तारांकित ४५७ पैकी ४५६ वैध मतांची मोजणी

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा सभागृह आज सकाळी ८ वाजता सुरू झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक नितीन पाटील जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडली. मतमोजणीनंतर अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी १४८ मतांच्या फरकाने विजय संपादन केला.

महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा सभागृह येथे सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर चव्हाण, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विकास व्यवहारे, उपजिल्हाधिकारी जे.पी. लोंढे, नायब तहसीलदार (निवडणूक) रोशनी दिघोरे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणीअंती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी ३०२ मते प्राप्त करून विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी उमेदवार नरेश ईश्वरकर यांना १५४ मते मिळाली, तर सचिन कुंभलकर यांना एकही मत प्राप्त झाले नाही. एकूण ४५७ मतांपैकी १ मत अवैध ठरले असून ४५६ मते वैध ठरली. मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवडणूक निरीक्षक नितीन पाटील तसेच जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सावन कुमार उपस्थित होते.

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील चार मतदान केंद्रांतून एकूण ४५७ मतपत्रिका प्राप्त झाल्या. यामध्ये भंडारा केंद्रातून १६६, साकोली केंद्रातून ६१, गोंदिया केंद्रातून १५४ आणि सडक-अर्जुनी केंद्रातून ७६ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी १ मत अवैध ठरल्यामुळे ४५६ मतांची मोजणी करण्यात आली.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

काँग्रेसकडे अधिकृत मतदारांची संख्या कमी असतानाही नरेश ईश्वरकर यांना अपेक्षेपेक्षा अधिक १५४ मते मिळाली. यात सत्ताधारी पक्षात अंतर्गत नाराजी असल्याचे दिसून येते. भाजपकडे संख्याबळ जास्त होते. मात्र मत कमी मिळाली. यावरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे दिसून येत आहे. -खा. प्रशांत पडोळे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *