तुमसर तालुक्यात वीज कोसळून महिलेसह २४ पशुधन दगावले
२२ शेळ्या व २ म्हशींचा समावेश
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर:- तालुक्यात दि. २२ जून २०२६ रोजी दुपारी झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून एका महिलेसह २४ जनावरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात लोहारा येथील महिलेचा समावेश असून देवनारा व सुकळी देवळी येथे २२ शेळ्या व २ म्हशी दगावल्या आहेत. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, दि. २२ जून रोजी अंदाजे दुपारी २ वाजताच्या सुमारास मौजा लोहारा ता. तुमसर येथील रहिवासी भिमलता भोजराम उचिबगले (वय ५०) यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी माहिती दिली.
याच दिवशी मौजा देवनारा ता. तुमसर येथे वीज पडून एकूण २२ शेळ्या मृत झाल्या. यामध्ये गौराबाई धनराज कोसरे यांच्या २, भारत भिका पंदाम यांच्या १४, ताराचंद श्रावण सलाम यांच्या ३, कन्हैया सुदाम मरसकोल्हे यांच्या २ आणि देवीचंद सिताराम मेश्राम यांची १ शेळी दगावली आहे. पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेळीपालन हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. त्याचप्रमाणे मौजा सुकळी देवळी ता. तुमसर येथे रुपेश मारुती चौधरी यांच्या मालकीच्या २ म्हशी वीज पडून मृत पावल्या. एकाच दिवशी झालेल्या या घटनांमध्ये एकूण २२ शेळ्या व २ म्हशी मिळून २४ पशुधन दगावले आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून सविस्तर पंचनामा व तलाठी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मृत महिलेच्या कुटुंबांना व पशुपालकांना शासन नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पावसाळ्यात वीज कोसळण्याच्या घटना वाढत असून नागरिकांनी मोकळ्या जागेत, झाडाखाली किंवा पाणथळ ठिकाणी उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.








