सह वर्षांपासून रखडलेला बेला-सिरसी रोड तातडीने सुरू करा

शिवसेना (उबाठा) चे जिल्हाधिकारी मार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- भंडारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या बेला-सिरसी बाह्यवळण रस्त्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे तातडीने बांधकाम सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, भंडारा यांच्यामार्फत मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ भंडारा शहरातून जात असल्याने तुमसर, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट व मध्य प्रदेशकडे जाणारी अवजड वाहतूक शहरातूनच होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून ६ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये बेला ते सिरसी हा बाह्यवळण मार्ग मंजूर करण्यात आला होता. जेणेकरून अवजड वाहतूक शहराबाहेरून वळवून शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल.

तत्कालीन राज्य सरकारने या रस्त्यासाठी भूसंपादनाकरिता ३ कोटी रुपये व बांधकामासाठी २ कोटी रुपये असे एकूण ५ कोटी रुपये मंजुरी केले होते. मात्र ६ वर्षे उलटूनही मंजूर झालेल्या ५ कोटींपैकी १ रुपयाही खर्च झाला नाही. कामाला सुरुवातच न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता झाल्यास तुमसर, तिरोडा, बालाघाट व मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या वाहनांचा किमान ४ ते ५ किमीचा फेरा वाचणार आहे. मात्र स्थानिक नेते व जनप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही नेत्यांनी स्वतःच्या नातेवाईकांच्या, कर्मचाऱ्यांच्या नावे जमिनी घेऊन ठेवल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. शासनाकडून निधी आलेला असूनही ‘कुठे माशी शिंकली देव जाणे’ सदर रस्त्याचे काम अंधारात आहे. मागील आठवड्यातच अदानी कंपनीच्या एका टिप्परने शहरात मोटारसायकल स्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे असे अपघात नित्याचेच झाले आहेत.

त्यामुळे बेला-सिरसी रस्ता बांधकामाच्या प्रक्रियेला गती देऊन लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हा रस्ता भंडारा शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे. सदर निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भाऊ रेहपाडे, तालुकाप्रमुख तिलक सर्वे, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख, मयूर जोशी, राजेश ठवकर, प्रकाश निनावे, प्रकाश गभणे, सोमेश्वर सेलोकर, नदीम शेख, राज वधवानी, शामराव मालखंडाळे इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *