आज मतमोजणी; कोण होणार आमदार ?

४५७ मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने?

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक

काशिनाथ ढोमणे
भंडारा (दै. लोकजन) : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी दि. २८ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आज दि. २२ जून रोजी लागणार आहे. पोलीस बहुउद्देशीय सभागृह, भंडारा येथे सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चहाच्या टपरीपासून ते राजकीय वतुळापर्यंत ‘कोण होणार नवीन आमदार?’ यावरच तर्कवितर्क लढवले जात आहेत. मतदारसंघात भाजपचे वर्चस्व कायम राहणार की काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार अनपेक्षित निकाल देईल, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर आणि अपक्ष उमेदवार सचिन कुंभलकर असे तीन उमेदवार रिंगणात होते. चुरशीच्या या लढतीत एकूण ४५७ मतदारांपैकी सर्व ४५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच या निवडणुकीत १०० टक्के मतदान झाले. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व नगराध्यक्ष असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदार होते. निवडणुकीसाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मिळून ४ निवडणूक केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. मतमोजणीसाठी स्वतंत्र कक्ष, सीसीटीव्ही निगराणी व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी होईल.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही कडक बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बहुउद्देशीय सभागृह परिसरात अतिरिक्त कुमक तैनात आहे. प्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर केला जाणार असून विजयी उमेदवाराला तात्काळ प्रमाणपत्र दिले जाईल. एकूणच, १०० टक्के मतदान झाल्याने ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली आहे.

भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचे पारडे जड
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता भाजपचे पारडे जड मानले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदांमध्ये भाजप व मित्रपक्षांचे सदस्य मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. पक्षानेही निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली होती. मात्र दुसरीकडे, काँग्रेसने अधिकृत उमेदवार न देता नरेश ईश्वरकर यांना अपक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे. ईश्वरकर हे जिल्ह्यातील अनुभवी व जनसंपर्क असलेले नेते आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व इतर छोट्या पक्षांचे तसेच काही अपक्ष सदस्यांची मते त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, गुप्त मतदान असल्याने ‘क्रॉस वोटिंग’ होऊ शकते. त्यामुळे ईश्वरकर हेच बाजी मारतील, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. तिसरे अपक्ष उमेदवार सचिन कुंभलकर यांच्यामुळे मतविभाणी होणार का, याकडेही लक्ष आहे. मात्र मुख्य लढत ब्राह्मणकर विरुद्ध ईश्वरकर अशीच होणार हे स्पष्ट आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *