अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर तुमसर पोलिसांच्या जाळ्यात
२२ लाख २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान तुमसर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले. या कारवाईत २२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २० जून २०२६ रोजी पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोउपनि. प्रबिन सयाम, पोउपनि. प्रितम येवले व पोलीस स्टाफ पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून मौजा पवना-रा येथे अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन पंचानसमक्ष सापळा रचला असता मौजा पवना-रा फाटा येथे रेतीने भरलेले ३ ट्रॅक्टर मिळून आले. पोलिसांनी १) रोहन शामा वाघाडे (२०) रा. गर्रा (बघेडा), २) निखिल राजेश पटले (२७) रा. बघेडा, ३) पिक्की खुशाल वाघाडे (२१) रा. मिटेवाणी, ४) शुभम रोशन पटले (२८) रा. मिटेवाणी व ५) अक्षय शिवचरण कटरे (२८) रा. येरली या पाच जणांकडून एकूण २२,२१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीचा समावेश आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक मयंक माधव, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. प्रबिन सयाम, पोउपनि. प्रितम येवले, पोना. गणेश मन्नाडे, पोशि. विजय दमाहे व पोशि. अभिषेक घोडमारे यांनी पार पाडली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. येवले व पोउपनि. सयाम करीत आहेत. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.








