पालोरा येथे आयुष्मान आरोग्य मंदिरात जागतिक योगा दिवस उत्साहात साजरा

 

दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- आज दिनांक २१ जून २०२६ रोजी पालोरा येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात जागतिक योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच शिल्पा तुमसरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजित श्रावणकर, आरोग्य सेविका संगीता पवनकर, कला चिंधालोरे, आशा वर्कर उषा बावनकर, माया खराबे, परिचर विणा टिचकुले, ग्रा. पं. कर्मचारी विलास खराबे, सुर्यभान तिजारे, लालचंद बुरडे, यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अजित श्रावणकर यांनी योगाचे महत्त्व व दैनंदिन जीवनातील फायदे याविषयी मार्गदर्शन करून केली. ‘नियमित योगा केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ राहते. ताण-तणाव कमी होऊन जीवनशैलीतील आजारांपासून बचाव होतो,’ असे त्यांनी सांगितले.

यानंतर आरोग्य सेविका संगीता पवनकर व कला चिंधालोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, अनुलोम-विलोम व कपालभाती यांसारखी विविध योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिकांसह केले. सरपंच शिल्पा तुमसरे यांनीही योगा प्रात्यक्षिकात सहभाग घेतला व ग्रामस्थांना दररोज किमान ३० मिनिटे योगा करण्याचे आवाहन केले. आशा वर्कर व परिचरांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना योगा नियमित करण्याची शपथ देण्यात आली.

आरोग्य मंदिराच्या वतीने दर आठवड्याला योगा वर्ग घेण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. श्रावणकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *