पावसाच्या दांडीने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या

शेतकरी हवालदिल, दुष्काळाचे गडद सावट

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने व मृग नक्षत्र लागून दहा दिवस उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने भंडारा जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतशिवारात पेरणीची लगबग दिसण्याऐवजी शुकशुकाट पसरला आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता हवालदिल झाला असून जिल्ह्यावर पुन्हा दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण २ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये धान हे प्रमुख पीक असून सोयाबीन, तूर, उडीद, मूंग यांचीही लागवड मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी ७ जून रोजी मृग नक्षत्र लागता शेतकरी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात करतात. मात्र यंदा १८ जून उजाडला तरी पावसाने हजेरीच लावलेली नाही. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ६ ते ७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तीही प्रामुख्याने बोअरवेल, विहीर व तलावाच्या पाण्यावर.

बोअरवेलधारकही संकटात
ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने धानाची रोपवाटिका म्हणजेच ‘पन्हे’ टाकली आहेत. मात्र ऐनवेळी महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दिवसातून सहा ते सात तासच वीज मिळते. त्यातही लो-व्होल्टेजमुळे मोटार चालत नाही. पाणी न मिळाल्याने पन्हे पिवळी पडून वाळण्याच्या मार्गावर आहेत.

पावसावर असलेले ८० टक्के शेतकरी प्रतीक्षेत
जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. हे शेतकरी अजूनही पेरणी न करता पावसाची वाट पाहत आहेत. ‘बियाणे, खत, औषधे घेऊन तयार आहोत. मजुरांचे आगाऊ पैसेही दिले आहेत. पण जमीन तापलेली आहे. कोरड्या जमिनीत पेरणी करून उपयोग नाही. पाऊस आल्याशिवाय काहीच करता येत नाही.’ अशी खंत पवनी येथील शेतकरी विलास उके यांनी व्यक्त केली. पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाचे आवाहन: घाईने पेरणी करू नका
दरम्यान, जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन केले आहे. जमिनीत किमान ७५ ते १०० मिमी ओल असणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात सरासरीच्या केवळ १५ टक्के पाऊस झाला आहे. कोरड्या जमिनीत पेरणी केल्यास बियाण्याची उगवण होणार नाही व दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाट पाहावी.

हवामान खात्याचा अंदाज काय
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २२ जूननंतर विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात २३ ते २६ जूनदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र तोपर्यंत पिकांचे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून निघणे कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *