बेघरांना निवारा व पट्ट्यासाठी भाकप तर्फे कलेक्टर कचरी समोर धरणे

बेघरांच्या वस्तीला कलेक्टर देणार भेट- कॉ. हिवराज उके
‘धरणे आंदोलनाला खासदार डॉ. पडोळे व ओबीसी संघर्ष समितीचे समर्थन’

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- मानवाधिकारापासून वंचित कुटुंबांना घरे व नागरी सुविधा पुरविणे तसेच अतिक्रमित घरकुलधारकांना पट्टे देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दि. १९ जून २०२६ ला कलेक्टर कचरी भंडारा समोर भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉ. हिवराज उके यांच्या नेतृत्वात धरणे व निदर्शने आंदोलन करून सावन कुमार जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात तकिया वार्ड भंडारा येथील रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडवासी व जिल्हा रुग्णालय भंडारा समोरच्या झोपडवासीयांना घरकुल व नागरिक सोयी आणि अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता.

मागण्यांसंबंधी बोलताना कॉ. हिवराज उके यांनी सांगितले की, आवास योजने अंतर्गत सर्वांना घरे, २०२२ तसेच हर घर नल व हर घर जल देऊ असे प्रधानमंत्री म्हणाले. तर नुकतेच महाराष्ट्र कॅबिनेटचा निर्णय सांगताना महसूल मंत्री नाम. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात एकही गरीब कुटुंब निवार्‌या विना राहणार नाही ही राज्य शासनाची भूमिका आहे. या वक्तव्याची आठवण तसेच अनेक जीआर असल्याचे कॉ. हिवराज उके यांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर सांगितले.

आणि दोन्ही झोपडपट्टीला भेट देण्याची सूचना केली असता जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याचे व लवकरच झोपडपट्टीला भेट देण्याचे आश्वासन दिले.

शिष्टमंडळात प्रामुख्याने कॉ. हिवराज उके यांच्यासोबत कॉ. सदानंद ईलमे, कॉ. प्रियकला मेश्राम, कॉ. गजानन पाचे, कॉ. भगवान मेश्राम, कॉ. दीपक अंकुशे, नुरी नैताम, करिष्मा निषाद, किशोर मेश्राम व अनेक बेघर झोपडपट्टी वासियांचा समावेश होता.

भाकपच्या या धरणे आंदोलनाला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले तर ओबीसी संघर्ष समितीने आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे कॉ. सदानंद इलमे यांनी जाहीर केले. भाकपच्या या धरणे आंदोलनात कॉ. माणिकराव कुकडकर, वामनराव चांदेवार, ताराचंद देशमुख, गणेश क्षीरसागर, राजू लांजेवार, हरिदास जांगडे, गौतम भोयर, पकली उईके व अनेक झोपडवासी व ओबीसी कार्यकर्ते सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *