भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान साहित्याचे वितरण पूर्ण

१८ जूनला मतदान, चार मतदान केंद्रांवर ४५७ मतदार बजावणार हक्क

मतदान केंद्र अधिकाऱ्यांना साहित्य वाटप करून पथके रवाना

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी १८ जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे चारही मतदान केंद्रांवरील मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. यानंतर मतदान पथके संबंधित केंद्रांकडे रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सावनकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हान, निवडणूक उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे, उपजिल्हाधिकारी महादेव जोरवर, उपजिल्हाधिकारी लीना फलके उपजिल्हाधिकारी जे. पी. लोंढे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ४५७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात दोन आणि गोंदिया जिल्ह्यात दोन अशी एकूण चार मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, भंडारा तसेच उपभागीय अधिकारी कार्यालय, साकोली येथील मंडळ अधिकारी यांच्या खोलीत मतदान केंद्र राहणार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथील खोली क्रमांक ४ आणि तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथील मीटिंग हॉलमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

भंडारा येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद भंडारा, नगर परिषद भंडारा, तुमसर, पवनी आणि नगर पंचायत मोहाडी येथील १६६ मतदार मतदान करतील. साकोली मतदान केंद्रावर नगर परिषद साकोली, नगर पंचायत लाखनी व लाखांदूर येथील ६१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद गोंदिया, नगर परिषद गोंदिया, तिरोडा व गोरेगाव येथील १५४ मतदार मतदान करतील. सडक अर्जुनी येथील मतदान केंद्रावर नगर परिषद सालेकसा तसेच नगर पंचायत देवरी, सडक अर्जुनी व अर्जुनी (मोरगाव) येथील ७६ मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना उमेदवारांना पसंतीक्रम देऊन मतदान करावे लागणार असून मतदानाची गोपनीयता अबाधित राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान करताना मतदाराचा स्वतंत्र निर्णय आणि मतदानाची गोपनीयता राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहा मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी वैनगंगा सभागृह, भंडारा येथे सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर मतमोजणीची व्यवस्था पोलीस बहुउद्देशीय सभागृह, भंडारा येथे करण्यात आली असून २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून ही निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *