पावसाची वाट ; मृग नक्षत्र लागून आठ दिवस उलटले तरी पाऊस गायब

दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा:- शेतीच्या हंगामाची नांदी मानले जाणारे मृग नक्षत्र लागून आठ दिवस उलटले तरी पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मृग लागताच शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतो. शेतात मोठी वदळ दिसते. मात्र यंदा आभाळ कोरडेठाक असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे.

७ जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात झाली. ‘मृग आला की पेरणीला सुरुवात’ अशी शेतकऱ्यांची परंपरा आहे. या काळात शेतकरी बी-बियाणे, खते खरेदी करून पन्हे भरण्यासाठी लगबग करतात. बैलजोडी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांग्रून ठेवले जाते. बाजारपेठेतही मोठी वदळ पाहायला मिळते. परंतु यावर्षी चित्र वेगळे आहे.

मृग नक्षत्राचे आठ दिवस पूर्ण होऊनही पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यामुळे शेतातील ओलावा पूर्णपणे नाहीसा झाला आहे. नांगरलेली शेते भेगाळली आहेत.

शेतकरी चिंताग्रस्त,आकाशाकडे डोळे

पाऊस नसल्याने पेरणी खोळंबली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

‘मृगात पेरणी केली तर पीक जोमात येते, असा आमचा अनुभव आहे. पण पाऊसचं नाही. तर पेरणी कशी करणार? उशीर झाला तर उत्पादनात घट येईल,’ अशी चिंता परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सोयाबीन, तूर, कापूस व धानाच्या पेरणीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वेळेवर पाऊस न आल्यास संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती आहे. आधीच खतांचे दर वाढल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आता पावसाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे.

हवामान खात्याने पुढील दोन-तीन दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवला असला तरी, पेरणीयोग्य पाऊस कधी होणार याची शाश्वती नाही. त्यामुळे बळीराजा अजूनही आभाळाकडे टक लावून पावसाची वाट पाहत आहे. पाऊस वेळेवर न आल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *