तुमसर पोलिसांची धडक कारवाई: ४० हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर:- तुमसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम नगर येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची अल्पावधीत उकल करण्यात भंडारा पोलिसांना मोठे यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रदीप प्रेमलाल गोरे (वय ४७, रा. मालवीय वॉर्ड, तुमसर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्यापासून बनविलेली ४.८० ग्रॅम वजनाची सोन्याची चपटी गोलाकार लगड किंमत ४० हजार रुपये जप्त केली आहे.

फिर्यादी चंद्रशेखर श्रीराम सार्वे, वय ४२, रा. श्रीराम नगर, तुमसर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ०५.३० वाजेच्या दरम्यान ते आपल्या घराला कुलूप लावून कामावर गेले होते. याचवेळी एका अज्ञात चोराने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील लाकडी कपाटातील पर्समध्ये ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे जुने मंगळसूत्र किंमत ४० हजार रुपये आणि ३० हजार रुपये रोख असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या घटनेप्रकरणी तुमसर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. २८३/२०२६ कलम ३३१(३), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक भंडारा नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक, तुमसर मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, पोलीस हवालदार शरद रामटेके, तसेच पोलीस शिपाई बळदे, राजकुमार गिरीपुंजे, नितीन झंझ़ाड, विजय दमाहे आणि अजय बावने यांनी ही यशस्वी कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *