पगारिया ग्रुप ऐकेना; प्रशासन कार्यवाही करेना
रस्त्याच्या कडेला मुरुम ऐवजी माती; चौकशीची मागणी
सिहोरा ते गोबरवाही सिमेंट रस्ता प्रकरण
दैनिक लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- पगारिया ग्रुप ऐकेना, प्रशासन कार्यवाही करेना दोष कुणाचा प्रशासनातील अधिकारी यांचा तर नाहीना असा जंगी टोला परिसरातील जनतेने लगावला आहे. पगारिया ग्रुपच्या वतीने सुरू असलेल्या सिमेंट रस्ता बांधकामाची प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे.
सिहोरा – गोबरवाही ते सिलेगाव वरून परसवाडा माडगी कडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. पाण्या अभावी काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या असल्याचे सांगितले जात आहे. रस्त्याच्या कडेला मुरुम ऐवजी भसवा माती व मलम भरला जात आहे. सिमेंट रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. सिहोरा व परिसरातील नागरिकांनी चौकशीची मागणी केली आहे.
सिहोरा ते सिलेगाव रस्ता नाली बांधकामात तयार करण्यात आलेले झाकण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भेगा पडलेल्या आहेत. पगारिया ग्रुप नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. रस्त्याच्या कडेला नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. नालीवर उभारण्यात आलेले सिमेंटचे झाकण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भेगा पडलेल्या आहेत. झाकण तुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी पगारिया ग्रुप आमच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला आहे. सिहोरा ते गोबरवाही फाटा या सिमेंट रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी भस्मा मुरुम, काही ठिकाणी मलमा तर काही ठिकाणी मातीने कडा भरल्या जात आहेत व भरणे सुरुच आहे. मातीने भरलेल्या कडा भर पावसात अपघाताला कारणीभूत ठरणार आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या चार चाकी असो की दुचाकी असो चिखलात खपून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिखलातून येणाऱ्या जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
निकृष्ट बांधकामाबद्दल जनतेच्या तक्रारीवर पगारिया ग्रुपच्या प्रतिनिधी वजा कर्मचाऱ्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत आहे. प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचा पगारिया ग्रुपला आशीर्वाद असल्याचा आरोप होत आहे. वैतागलेल्या जनतेने आता पगारिया ग्रुपच्या विरोधात सिहोरा येथे तुमसर बपेरा राज्य मार्गावर जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे तर याकडे लोकप्रतिनिधीचे सुद्धा लक्ष वेधण्यात आले आहे.








