साकोलीत येथे हनुमान मंदिरात मूर्तींची तोडफोड

दैनिक लोकजन वृत्तसेवा
साकोली :- साकोली शहरातील बस स्टॉप समोर असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी घुसून गणपती आणि शंकराच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. अज्ञात व्यक्तीने मंदिरातील मूर्ती तोडफोड करून खाली फेकल्या. तसेच मंदिरातील इलेक्ट्रिक बोर्ड आणि दाराचे पडदेही तोडून फेकून देण्यात आले असून मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे.

आज दि. १५ जून रोजी सकाळी दैनंदिन पूजा पाठविधीसाठी भाविक नेहमीप्रमाणे मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला. मंदिर साकोली बस स्टॉप परिसरात आहे. मंदिरातील गणपती आणि शंकराच्या मूर्तीची तोडफोड करून त्या खाली फेकण्यात आल्या. मूर्तीचे तुकडे मंदिरात सर्वत्र पडले होते. केवळ मूर्तीच नव्हे तर मंदिरात लावलेला इलेक्ट्रिक बोर्ड पूर्णपणे तोडण्यात आला. तसेच दाराचे पडदे फाडून फेकण्यात आले. मंदिरातील सामानाचीही बऱ्याच प्रमाणात नासधूस झाली आहे. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मंदिर परिसराची बारकाईने पाहणी केली आणि पंचनामा केला. याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विटंबनेमुळे साकोलीतील भाविकांमध्ये आणि हिंदू समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. बस स्टॉपसारख्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मंदिरात अशा प्रकारे विटंबना झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘ही घटना आगीत तेल ओतल्यासारखी आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे,’ अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, लवकरात लवकर दोषींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तथा सर्वपक्षीय सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *