भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी करिता प्रहारने दिले निवेदन; १ जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

दैनिक लोकजन वृत्तसेवा
तिरोडा: – भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ आठ तासांच्या वीजपुरवठ्यावर शेती करणे अशक्य होत असल्याचा दावा करत प्रहार जनशक्ती पक्षाने कृषीपंपांना २४ तास वीजपुरवठा देण्याची मागणी केली आहे. तसेच शेती वीजजोडणीसाठी लागू करण्यात आलेली सोलर कनेक्शनची सक्ती रद्द करून पूर्वप्रमाणे नियमित विद्युत कनेक्शन सुरू करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.

ऊर्जामंत्री यांना उद्देशून सोमवार १५ जून रोजी तहसीलदार, तिरोडा यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनात गोंदिया जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि भात पिकाच्या पाण्यावरील अवलंबित्व अधोरेखित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी भात शेतीवरच उदरनिर्वाह करतात. उन्हाळी व खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. या पिकासाठी इतर पिकांच्या तुलनेत अधिक पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे शासनाच्या विद्यमान आठ तास वीजपुरवठ्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थापनात गंभीर अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महेंद्र भांडारकर यांनी सांगितले की, याच मागण्यासंदर्भात ८ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री यांना देखील निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून त्यांच्या अडचणी अधिक तीव्र होत आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

निवेदनात कृषीपंपांसाठी सोलर कनेक्शनची सक्ती रद्द करून ती ऐच्छिक करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक व भौगोलिक कारणांमुळे सोलर योजनेचा लाभ घेणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पूर्वप्रमाणे नियमित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास १ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ज्योती लिलहारे, सामाजिक कार्यकर्ते खुशाल शेंडे, गांगला येथील सरपंच बुद्धेजी गांगला, उपसरपंच राजू मेहेर, बायवाडा येथील उपसरपंच महेंद्र भुरे तसेच विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता शासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *