भंडारा पोलिस दलातर्फे ‘ऑल आऊट ऑपरेशन’
२८ अधिकारी, २४९ अंमलदार सहभागी
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा: – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणतेही घातपाती कृत्य अथवा अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने भंडारा पोलिस दलाने दि. १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ यशस्वीरित्या राबवले. पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या ऑपरेशनमध्ये २८ अधिकारी व २४९ अंमलदार सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीत एकाच वेळी कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली. कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये २३, जुगार कायद्यान्वये २, मोटार वाहन कायद्यान्वये ९७ केसेस, ड्रंक अँड ड्राइव्हचे २१ गुन्हे दाखल करण्यात आले. तर अवैध रेती वाहतुकीवर १ कारवाई करण्यात आली.
याशिवाय कारागृहातून सुटलेले गुन्हेगार, अभिलेखावरील गुन्हेगार, माहितीगार गुन्हेगार अशा एकूण २५ इसमांची घरे तपासण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ५९३ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक बसवणे, स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, दहशतवादी व नक्षलवादी कारवाया रोखणे हा मुख्य उद्देश होता.
दरम्यान, जिल्ह्यातील अवैध धंदे व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी अवैध धंदे करणारे, अंमली पदार्थ सेवन करणारे, बाळगणारे, विक्री करणारे यांची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी केले आहे.








