भंडारा जिल्ह्याला लवकरच ३० नवे केंद्रप्रमुख मिळणार
बारा वर्षांची प्रतीक्षा संपणार
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा : – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ अंतर्गत केंद्रप्रमुख नियुक्ती प्रक्रियेला वेग आला असून, भंडारा जिल्ह्याला लवकरच ३० नवे केंद्रप्रमुख मिळणार आहेत. तब्बल बारा वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदांच्या नियुक्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही गैरसमज पसरविले जात असल्याने पात्र गुणवंत उमेदवारांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
उमेदवारांच्या मते, सदर नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही घाईगडबडीत न राबवता सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करूनच पुढे नेली जात आहे. शिक्षण विभागाकडून नियुक्तीची घाई होत असल्याचे किंवा गुणवंत उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे आरोप तथ्यहीन असून त्यातून दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रप्रमुख भरती प्रक्रियेवर यापूर्वी न्यायालयीन स्थगिती होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दि. २६ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार सदर प्रक्रियेवरील अंतरिम स्थगिती उठविण्यात आली. त्यानंतर शिक्षण विभागाने पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने उमेदवारांना महाटेट किंवा सीटीईटी पात्रता प्राप्त करण्यासाठी ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंतिम मुदत दिली होती. या निश्चित कट-ऑफ तारखेनंतर पात्रता प्राप्त केलेल्या उमेदवारांचा प्रक्रियेत समावेश करणे हे मूळ जाहिरात व नियमावलीच्या विरोधात ठरेल. त्यामुळे न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन करणे आवश्यक असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी आणि केंद्रस्तरावरील शैक्षणिक व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी केंद्रप्रमुख पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक वर्षे ही पदे रिक्त राहिल्यामुळे शैक्षणिक प्रशासनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर नियुक्ती प्रक्रिया राबविणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शालेय शिक्षण विभागाने दि. ४ जून २०२६ रोजी जिलहानिहाय निवड यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी व इतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून लवकरच अंतिम नियुक्ती आदेश निर्गमित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पात्र गुणवंत उमेदवारांनी सर्व संबंधितांना कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयीन आदेश, शासन निर्णय आणि नियमावली यांच्या चौकटीतच ही प्रक्रिया सुरू असल्याने अंतिम निर्णयाचा आदर करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्रप्रमुख पदांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रशासनाला बळकटी मिळणार असून प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








