जीवे मारण्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नराधम आरोपीला अटक, लाखनी तालुक्यातील घटना
दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी:- येथील तालुक्यातील एका गावच्या १६ वर्षीय अल्पवयीन पीडिता हिच्या तक्रारीवरून लाखनी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या संदर्भात पीडितेने तिच्या नातेवाईकांना या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्यात संबंधित नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने हालचाली करून संबंधित आरोपीला अटक केली आहे.
राज्यात सर्वत्र अल्पवयीन बालिकांवर अत्याचार केल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासन आणि पोलीस प्रशासन सतर्क असून शाळा, महाविद्यालयात मुलीचे समुपदेशन केले जात असलेतरी वाढत्या लैंगिक घटनावर हतबल झाले आहे. दरम्यान मागील महिन्यात लाखनी तालुक्यातील अनेक गावांत असाच प्रकार उघडकीस आल्याने विविध गुन्हे दाखल झाले आहे.
राकेश दिनेश आंबिलकर वय २५ वर्षे रा. लाखनी ता. लाखनी जि. भंडारा याने अनुसूचित जातीच्या १६ वर्षीय अल्पवयीन पीडितेला जीवे मारून ठार करण्याचा धाक दाखवून तिच्यावर ६ नोव्हेंबर २०२४ पासून ते १६ एप्रिल २०२६ पर्यंत पर्यटन स्थळ मौजा- रावणवाडी ता. जि. भंडारा आरोपीने आपल्या राहते घरी वारंवार अत्याचार केला. विशेष म्हणजे तिच्या परिवाराला देखील ठार करण्याचा धाक दाखवल्याने संबंधित पीडिता घाबरली. याचाच फायदा घेऊन नराधम दिनेश आंबिलकर याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. अखेर या पिडितेने तिच्या नातेवाईकांना ही माहिती सांगितली. त्यामुळे फिर्यादी पीडिता ही लाखनी पोलीस स्टेशन गाठून या घटनेची माहिती दिली.
पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश आंबिलकर याच्या विरोधात अप. क्र. -३०२/ २०२६ कलम ६४ (२) (आय) (एम), ६५ (१), ३५१ (२) भा. न्या. सं. २०२३ सहकलम ६ पोस्को सहकलम ३(२) (व्ही), ३(१) (डब्ल्यू) अ.जा.ज.प्रतिबंधक कायदा अंतर्गत पो. नि.आशिष गजभिये पो.स्टे. लाखनी यांनी गुन्हा दाखल करून पिडितेच्या गावाला भेट देऊन घटनेची प्राथमिक चौकशी केली आहे. दरम्यान या घटनेची गंभीरता ओळखून घटनेचा तपास शिवम विसापुरे उप विभागीय पोलीस अधिकारी साकोली यांच्याकडे सोपविला आहे. तसेच पिडितेची कायदेशीर ई साक्ष नोंदवण्याची कार्यवाही करण्यात आली असून आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून भंडारा येथील कारागृहात नेण्यात आले.









