ई-पॉस मशीनद्वारे खत विक्री करा, अन्यथा कारवाई

गरज १.४ लाख टनांची; शिल्लक केवळ ३८ हजार मेट्रिक टन
जिल्ह्यातील ६६२ विक्री केंद्रावर गैरप्रकार वाढण्याची शक्यता

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- हंगामात खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात ८६२ विक्री केंद्रावर ई-पॉस मशीनद्वारे विक्री करणे बंधनकारक करण्यात आली आहे. बियाणे आणि खतांच्या गैरप्रकारासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

युरिया व डीएपी खतासाठी वाढणार ओरड
धानाची पेरणी झाल्यानंतर व पीक वाढीसाठी युरिया खताचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे पेरणीच्या प्रारंभीच युरियाची मागणी वाढणार आहे. जिल्ह्यात सध्या १८, ३७५ मेट्रिक टन उपलब्ध युरिया खतापैकी ११ जूनपर्यंत ५, ६७० मेट्रिक टन खताची विक्री झाली असून १२, ७०५ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. डीएपी खताच्या ३, ५०१ मेट्रिक टन साठ्यापैकी १, ८३१ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून केवळ १, ६७० मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे.

धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या प्रारंभीच रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा एललिनोच्या प्रभावामुळे कमी तसेच खंडित पाऊस होण्याच्या अंदाज असून मृगात धूळपेरणी न करता चांगला पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अशातच जिल्ह्यातील एकूण ६२,००३ मेट्रिक टन उपलब्ध रासायनिक खत साठ्यापैकी ११ जूनपर्यंत १३,६९८ मेट्रिक टन खतांची विक्री झाली असून केवळ ३८,३०५ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. परिणामी, काळाबाजाराला वेग येण्याची शक्यता आहे.

यंदा कृषी विभागाने १,९८,०९३ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याचे उद्दिष्ट ठरविले असून सर्वाधिक १.८५ लाख हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस होताच पेरणीला वेग येणार असून पिकांच्या वाढीसाठी युरिया, डीएपी व अन्य खतांची गरज भासणार आहे. यंदाच्या हंगामासाठी १ लाख ४ हजार ५०० मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज भासणार आहे. परंतु, सध्या उपलब्ध एकूण खतांपैकी ११ जूनपर्यंत १३ हजार ६९८ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून केवळ ३८ हजार ३०५ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे मागणीनुसार खतांचा पुरवठा कमी होऊन तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

“शेतकऱ्यांनी बोगस बियाणे किंवा ज्यादा दराने खत विक्री करणाऱ्याविरुद्ध पुराव्यासह ९४२३०२८३७२ या भ्रमणध्वनीवर तक्रार करावी. तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल.”
– विकास सोनवाने, जिल्हा कृषी अधिकारी, जि. प. भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *