राजीव गांधी चौकातील अपघातांना आला घाला
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्याधिकारी यांना निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- शहरातील अत्यंत वर्दळीच्या राजीव गांधी चौक येथे वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चौकातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी आणि रस्त्यावरील वाढते अतिक्रमण हटविण्यासाठी राजीव गांधी चौक मित्र परिवार, नगरसेवक मंगेश बंजारी तसेच प्रिती गाढवे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
हे निवेदन मा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद भंडारा यांना सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजीव गांधी चौक हा शहरातील महत्त्वाचा व अतिवर्दळीचा चौक असून येथे वारंवार अपघात घडत आहेत. अलीकडेच झालेल्या अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवेदनानुसार, चौकाकडे जाणाऱ्या सातही मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच काही मार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही त्यांचा प्रवेश होत असल्याचे आरोप करण्यात आला आहे.
राजीव गांधी चौक मित्र परिवाराने प्रशासनाकडे चौकात कायमस्वरूपी वाहतूक सुधारणा उपाययोजना राबविण्याची, अतिक्रमण हटविण्याची तसेच अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जनआंदोलन व बेमुदत उपोषणाचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
राजीव गांधी चौक मित्र परिवाराचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक राजेश धुर्वे, नगरसेवक हरिशचंद्र मडावी, पंजाबराव कारेमोरे, शैलेश डुंबरे, दिपक बत्रा, विकास घाटबांधे, सुर्या गिरेपुंजे, निलेश गाढवे, बंटी मदारकर, बालु कढव, सुनील ढवळे, प्रशांत केसरकर, मोहित मधतानी, प्यारेलाल जांभूळकर, शुभम गौतम, प्रफुल्ल ढोमणे, सुनील पैक, देवेश पशिने, रिंकू मोहबे इ बहु संख्येने राजगोपालाचारी वार्डातील नागरिक उपस्थित होते.








