भंडग्यात गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा घाला; १.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथे घरातून गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई; पुरवठादारांचा शोध सुरू

दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक महत्त्वाची कारवाई करत गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथून १३४ ग्रॅम गांजा व मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका ५२ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, गांजाचा पुरवठा करणाऱ्या अन्य संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ११ जून रोजी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत असताना भंडगा गावातील पुष्पा ऊर्फ मंगला मोतीराम मौजे ही महिला आपल्या घरात गांजा साठवून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पंचांसमक्ष तिच्या घराची झडती घेतली.

झडतीदरम्यान पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत ठेवलेला हिरवा ओलसर गांजा, त्यामध्ये पाने, फुले व बिया मिश्रित स्वरूपातील १३४ ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आला. जप्त गांजाची किंमत ९३ हजार ४०० रुपये असून, व्यवहारासाठी वापरला जाणारा पोको कंपनीचा मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला. मोबाईलची किंमत सुमारे १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित महिलेने हा गांजा गोंदिया शहरातील दोन व्यक्तींकडून विकत घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार गोरेगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. ही कारवाई सपोनि धीरज राजुरकर, पोलीस हवालदार दिक्षितकुमार दमाहे, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, महिला पोलीस शिपाई स्मिता तोंदरे आणि घनशाम कुंभलवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला या कारवाईमुळे आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *