मातोश्री पांदन रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

 

सरपंच संघटनेचे उपविभागीय अभियंत्यास निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- मातोश्री पांदन रस्ता योजने अंतर्गत मोहाडी तालुक्यातील शेतरस्त्यांची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी युध्दपातळीवर पूर्ण करण्यात यावी. तसेच राजकीय हेतूने होणाऱ्या खोट्या तक्रारींची शहानिशा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन १२ जून रोजी मोहाडी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने तुमसर येथील उपविभागीय अभियंता प्रफुल्ल झाडे यांना देण्यात आले.

शासनाच्या महत्वाकांक्षी मातोश्री पांदन रस्ता योजनेअंतर्गत मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतरस्त्यांच्या खडीकरण व मजबुतीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. सदर कामांवर सरपंच संघटना व स्थानिक शेतकरी लक्ष ठेवून आहेत. प्रत्यक्ष पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधल्यामुळे रस्ते चांगल्या स्थितीत होत असल्याने कृषी उत्पादनाची ने-आण, खते-बियाणे वाहतूक आणि यांत्रिकीकरण यात मोठी सुलभता येणार आहे. मात्र, काही मोजक्या व्यक्तींकडून राजकीय आकसापोटी व वैयक्तिक स्वार्थासाठी सदर कामांबाबत निराधार व वस्तुस्थितीला धरून नसलेल्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयांकडे केल्या जात आहेत. परिणामी, कंत्राटदारांवर अनावश्यक दबाव येऊन कामाचा वेग मंदावत आहे. सध्या पावसाळा तोंडावर असून कामे अपूर्ण राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे मंजूर सर्व शेतरस्त्यांची कामे प्रशासनाच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली व ठरवून दिलेल्या दर्जानुसार ३० जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी मोहाडी तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष भूपेंद्र नागफासे, शिवनीचे उपसरपंच महादेव बांते, सरपंच राजेश हटवार, गुलाब सब्वालाखे, मनोहर राखडे, रेश्मा ईश्वरकर, गोलू रोटके, अर्जुन उईके व अन्य सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *