खताचे दर वाढल्याने शेतकरी चिंतेत
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खरीप हंगाम तोंडावर आला असताना रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत डीएपी, युरिया, पोटॅश व मिश्रखतांच्या किमती प्रति पोते ३०० ते ६०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. खतांच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणाव्यात, शेतकऱ्यांना अनुदानित दरात खत उपलब्ध करून द्यावे व खरीप हंगामासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ व वाहतूक खर्च वाढल्याने खतांच्या किमती वाढल्याचे सांगण्यात येत आहे. खतांच्या दरवाढीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अधिकच चिंतेत सापडला असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा भविष्यात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होवू शकते.








