अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जेसीबी सह २ ट्रॅक्टर ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा:- जांबकांद्री वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या रोहा येथील वनविभागाच्या जमिनीत सुरू असलेल्या मुरुमाच्या अवैध उत्खननाचा प्रकार वनविभागाच्या धडक कारवाईत उघडकीस आला आहे. ९ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून १ जेसीबी व २ ट्रॅक्टर जप्त केले आहे. रोहा येथील वनविभागाच्या जागेत मुरुमाचे अवैध उत्खनन करून चोरी केली जात असल्याची कुणकुण बिट रक्षक वर्षा दराडे यांना होती.

याचीच दखल घेत आंधळगाव सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक सुनील वैद्य, बिट रक्षक उपाध्ये व हटवार यांनीसापळा रचला व आपल्या पथकासह घटना स्थळ गाढले. वनविभागाचे वाहन येत असल्याचे लक्षात येताच कारवाईच्या भीतीने जेसीबी व ट्रॅक्टर चालकाने अंधाराचा फायदा घेत घटना स्थळावरून आपला पळ काढला. वनविभागाच्या पथकाने मात्र घटना स्थळावरून अवैधरित्या उत्खननासाठी वापरण्यात आलेली १ जेसीबी व २ ट्रॅक्टर ताब्यात घेतले. सदर प्रकरणाची वन विभागाने वन कायदे अंतर्गत वन गुन्ह्याची नोंद केली असून जप्त करण्यात आलेली वाहने जांबकांद्री वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भंडाराचे उप वनसंरक्षक योगेंद्र सिंह, सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी गडेगाव, रितेश भोंगाडे, जांमकांद्रीचे वनपरिक्षेत्रअधिकारी एन. पी. वैद्य आणी आंधळगावचे क्षेत्र सहाय्यक सुनील वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कार्यवाहीत कु. व्ही. ए. दराडे बिट रक्षक हरदोली अतिरिक्त कार्यभार बेटाळा, उपाध्ये बिट रक्षक आंधळगाव, हटवार, पाटील (वनमजूर) तसेच जांबकांद्री वन परिक्षेत्रातील वनरक्षक व शीघ्र बचाव पथकाचे सदस्य आणि इतर वन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.वनविभागाच्या या कार्यवाहीमुळे वनसंपदेची अवैध लूट करणाऱ्या भूमाफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी पुढेही कार्यवाही सुरूच ठेवणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *