विहिरीच्या काठावर थरार! बोलेरो पिकअप अर्धी विहिरीत, अर्धी बाहेर लटकली

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- काही क्षणांचा विलंब झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. चौंडेश्वरी मंदिराच्या मागील भागात एका बोलेरो पिकअप गाडीचे संतुलन बिघडल्याने ती थेट नाल्याच्या काठावरील विहिरीच्या दिशेने घसरली आणि विहिरीचे कठडे तोडत अर्धी विहिरीत तर अर्धी बाहेर अशा थरारक अवस्थेत लटकून राहिली. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा वेग आणि अचानक बिघडलेले संतुलन यामुळे चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. गाडी विहिरीच्या कठड्यावर आदळताच मोठा आवाज झाला आणि क्षणभर परिसरातील नागरिकांची धडधड वाढली.

मात्र चालक आणि क्लीनर यांनी प्रसंगावधान राखत वेळेवर गाडीतून उडी घेतल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विहिरीच्या कठड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला असून परिसरातील नागरिकांनीही या नुकसानीबद्दल हळहळ व्यक्त केली. माहितीनुसार, ही बोलेरो पिकअप रोहित ठोंबरे यांच्या मालकीची असून परिसरात “बकासुर’ या नावाने प्रसिद्ध आहे. अपघातानंतर विहिरीच्या काठावर धोकादायकरीत्या लटकलेल्या गाडीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अनेकांनी मोबाईलमध्ये या थरारक प्रसंगाचे छायाचित्रणही केले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची आणि अरुंद रस्त्यांवर अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *