धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक
अखंडित वीजपुरवठा व लिफ्ट इरिगेशनसाठी मुकुंद साखरकर यांच्या नेतृत्वात निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :— खुटसावरी, टेकेपार, पिंपळगाव, माटगी, राजेगाव तसेच धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावांतील असंख्य शेतकरी बांधवांनी आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहून शेतीसाठी होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अडचणी व सिंचनाच्या समस्येबाबत निवेदन सादर केले.
यावेळी शेतकऱ्यांनी अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची व्यथा मांडली. शेती वाचविण्यासाठी अखंडित व नियमित वीजपुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांच्या नेतृत्वात शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गंभीरतेने ऐकून घेतल्या व या विषयावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय उपाययोजना करण्यात येतील, तसेच सदर क्षेत्रामध्ये लिफ्ट इरिगेशन योजना आणता येत असल्यास त्यासाठीही सकारात्मक पद्धतीने पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे हीच आमची प्राथमिकता आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा असून त्यांच्या शेतीला वेळेवर पाणी व अखंडित वीजपुरवठा मिळालाच पाहिजे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची वेळेत अंमलबजावणी करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ.’ असे त्यांनी सांगितले.
सदर मागण्यांवर वेळेत योग्य ती कारवाई न झाल्यास धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त गावकरी व शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी टेकेपारचे उपसरपंच इरफान पटेल, निखिल पोतरवार, घनश्याम हारगुडे, संजीव शेंदे, धनराज कायते, राकेश शेंदे, राजेश शेंदे, महादेव चेटुळे, विलास चेटुळे, श्यामराव मस्के, राजू शेंदे, देवदास ठावकर, फत्तू वैद्य, मोरेश्वर मडावी, श्रावण गिरेपुंजे, सुनील डोय, गणेश चेईले, निरदन कडाव, आकाश शेंदे, अरविंद मस्के, योगेश लांजेवार, रामेश्वर गिरेपुंजे, सतीश गायते, धनराज गायदने, श्रावण भिगोरे, सुधाकर वागाडे, अमित थोते, भीमराव वाहने, रामचंद्र भैसारे, शुभम थोते, सत्यवान चेईले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.








