राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे नेते उपस्थित

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महायुतीच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांनी राज्यसभ सदस्यपदासाठी विधान भवन, मुंबई येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष तथा खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खा. पार्थ पवार, मंत्री इंद्रनील नाईक, भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा मंत्री आशिष शेलार, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यासह आ. समीर भुजबळ, आ. संजय खोडके, आ. राजकुमार बडोले, आ. राजूभाऊ कारेमोरे व महायुतीचे इतर प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेंद्र जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली मला राज्यसभेत काम करण्याची संधी मिळत आहे. महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी मी संसदेत आवाज उठवेन.’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

राजेंद्र जैन हे गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असून सहकार व व्यापार क्षेत्रातील त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे विदर्भाला राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *