एकाच रात्री तीन घरफोड्या होऊनही चोर मोकाट

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- शहरात रात्रकालीन चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २ जूनच्या रात्री व ३ जूनच्या पहाटे एकाच रात्री शहरातील तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यात सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून तीन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती चोर लागले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सविस्तर असे की, अंबिका नगर येथील फिर्यादी रमेश शेंडे हे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिने व नगदी असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लापास केला. शेंडे कुटुंबीयांना सकाळी जाग आल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आले. दुसरी घटना याच रात्री अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी कॉलनी, भोजापूर येथे घडली. चंद्रशेखर मेश्राम यांच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ६ हजार रुपये रोख असा एकूण ६६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. मेश्राम कुटुंबीय बाहेरगावी गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली. तिसऱ्या घटनेत तकिया वार्ड येथील साई मंदिराच्या मागील भागात राहणारे रामभाऊ साठवणे यांच्या घरी चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. घरातील सामान अस्तव्यस्त फेकले, कपाटे उचकटली, मात्र मौल्यवान ऐवज हाती न लागल्याने चोरांनी त्यांची चारचाकी गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गाडी पंक्चर असल्याने चोरांना ती नेता आली नाही.

विशेष म्हणजे चोर चारचाकी वाहनाने आल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. मात्र, फुटेज अस्पष्ट असल्याने चोरांची ओळख पटलेली नाही. या तिन्ही घटनांची नोंद भंडारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. एकाच रात्री, एकाच परिसरात तीन घरफोड्या झाल्याने पोलिसांच्या रात्रगस्तीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रामभाऊ साठवणे यांच्या घराजवळील सीसीटीव्हीमध्ये चोर व त्यांचे वाहन दिसत आहे. चारचाकी गाडीचा नंबर प्लेट स्पष्ट नाही. परिसरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासल्यास चोरांचा माग लागण्याची शक्यता आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही.

शहरात सातत्याने वाढणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच, जुन्या गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन तपासाला गती द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. मात्र, सलग तीन घरफोड्या होऊनही चोर मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *