भंडारा शहरात नियम धाब्यावर बसवून धार्मिक स्थळापासून ७५ मीटर अंतरात बिअर बार
जी. बी. रेस्टॉरंट ॲण्ड बारचा परवाना रद्द करण्याची मागणी
दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :— शहरातील खामतलाव देशबंधू वार्ड येथील जी.बी. रेस्टॉरंट ॲण्ड बिअर बारचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. धार्मिक स्थळापासून ७५ मीटरच्या आत बिअर बारला परवाना देता येत नसतानाही नियम धाब्यावर बसवून जी. बी. रेस्टॉरंट ॲण्ड बिअर बारचा परवाना दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, जी.बी. बिअर बारच्या ७० ते ८० मीटर परिसरात बहिरंगेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, राम मंदिर, रामायण पार्क व रामद्वारा साधू समाधी देवस्थान अशी ४ ते ५ धार्मिक स्थळे आहेत. येथे दररोज भाविकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते व गणपती विसर्जनासाठीही नागरिक येतात. दरवर्षी श्री राम शोभायात्रा येथूनच निघते. गंभीर बाब म्हणजे रामद्वारा समाधी विश्वस्त मंडळाचे प्रवेशद्वार व धार्मिक स्थळ बिअर बारपासून फक्त १० ते १२ मीटर अंतरावर आहे. या जागेवरून विश्वस्त मंडळ व बाच्छील परिवाराचा न्यायालयात वाद सुरू असताना बिअर बारचे मालक गुड्डू उर्फ ललीत नंदलाल बैस यांनी बळजबरीने सुरक्षा भिंत तोडून पार्किंग केली. दारुडे गाडी पार्क करून तिथे लघवी करतात, त्यामुळे धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग होत असल्याचा आरोप आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, बळजबरीने पार्किंग करणाऱ्या बिअर बारचे मालक गुड्डू उर्फ ललीत नंदलाल बैस याने रमनसिंह बाच्छील यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून रमनसिंह यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी बिअर बारचे मालक गुड्डू उर्फ ललीत नंदलाल बैस भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार धार्मिक स्थळापासून ७५ मीटरच्या आत बिअर बारचा परवाना देता येत नाही. तरीही परवाना कसा दिला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिकांच्या धार्मिक भावनांचा आदर करून जी.बी. बिअर बारचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी विनंती नागरिकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व ठाणेदार तसेच वरीष्ठ अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.








