करडी पोलीस स्टेशनची अवैध रेती वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई

✻ तीन ट्रॅक्टर जप्त, चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
✻ २१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

दैनिक लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतुकीविरुद्ध दिनांक ०७ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान अवैध रित्या रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीससह रंगेहाथ पकडण्यात आले.

सदर कारवाईमध्ये प्रत्येकी ७ लाख रुपये किमतीचे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीससह असा एकूण २१ लाख रुपये किमतीचे वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास प्रमाणे एकूण ३ ब्रास रेती जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत १८ हजार रुपये आहे. अशाप्रकारे या कारवाईत एकूण २१ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी करडी पोलीस स्टेशन येथे अप. क्र. १७६/२०२६, १७७/२०२६ व १७८/२०२६ असे स्वतंत्र तीन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. एकूण चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०२(२), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४७, ४८ व पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध रेती उत्खनन व वाहतूक यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबरच पर्यावरणाचीही हानी होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध करडी पोलीस स्टेशनकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. करडी परिसरात अवैध रेती उत्खनन किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ करडी पोलीस स्टेशनला कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असे ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत यांनी आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *