गटशिक्षणाधिकारी राठोड व केंद्रप्रमुख राजश्री शिंदे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- धारगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख राजश्री शिंदे तथा पंचायत समिती भंडाराचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्या दुहेरी संगम सेवानिवृत्तीचा भव्य व भावपूर्ण सोहळा दि. ३० मे २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धारगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य अस्मिता डोंगरे होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये पं. स. सदस्य कांचन वरठे, प्रभारी केंद्र प्रमुख सूर्यभान बावनकुळे, माजी प्रभारी केंद्रप्रमुख जगणिक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी विनोद विद्यालय टेकेपार येथील मुख्याध्यापक नरेंद्र गायधने व इतर शाळांनी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख राजश्री शिंदे व गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.

प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य नरेंद्र गायधने यांनी दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात अस्मिता डोंगरे यांनी दोन्ही मान्यवरांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.

यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतात राजश्री शिंदे व शंकर राठोड यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शैली यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. सेवानिवृत्त होत असलेल्या दोन्ही मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त करत सेवाकाळातील अनुभव कथन केले. शिक्षण क्षेत्रातील सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांचे हित आणि शिक्षणाची गुणवत्ता हीच आपली खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही मान्यवरांना निरोप दिला. त्यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील आयुष्यासाठी आरोग्य, आनंद आणि यशाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. धारगाव केंद्रातील हा दुहेरी संगम सेवानिवृत्ती सोहळा उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील असा संस्मरणीय ठरला हे विशेष उल्लेखनीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *