परीक्षा व्यवस्थेलाच सुरुंग? साखरीटोला: केंद्रावर ‘डमी’ परीक्षार्थी पकडल्याने खळबळ!
बी.कॉम. परीक्षेत एका विद्यार्थ्याच्या जागी दुसऱ्याने लिहिला पेपर; विद्यापीठाच्या कारवाईकडे लक्ष
दैनिक लोकजन वृत्तसेवा
गोंदिया: शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील महाविद्यालयीन परीक्षा केंद्रावर उघडकीस आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.कॉम. द्वितीय वर्षाच्या पर्यावरणशास्त्र परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीने परीक्षा दिल्याचा प्रकार समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, साखरीटोला येथील परीक्षा केंद्रावर बी.कॉम. भाग-दोनचा पर्यावरणशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. कालिमाटी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य गोविंदलाल गणवीर याच्या नावाने परीक्षा अर्ज भरलेला होता. मात्र संबंधित विद्यार्थी रोजगारानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत त्याच्या जागी गोंदिया तालुक्यातील तेढवा येथील आरजू आशिक गजभिये हा युवक परीक्षा देत असल्याचे संशय निर्माण झाला.
परीक्षा केंद्रातील हालचालींबाबत सजग असलेल्या काही नागरिकांनी आणि पत्रकारांनी या प्रकाराची दखल घेतल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच केंद्र प्रशासनात एकच खळबळ उडाली. परीक्षेच्या पवित्रतेवर आघात करणाऱ्या या प्रकारामुळे केंद्रावरील देखरेख व्यवस्था आणि ओळख पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात केंद्र संचालक आणि संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून संबंधित विद्यार्थ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चानाही उधाण आले आहे. काहींनी संबंधित परीक्षार्थी दुसऱ्या वर्खोलीत असल्याचे दावा केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गैरप्रकार रोखण्याऐवजी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात सालेकसा पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्राथमिक स्वरूपात घटनेची माहिती मिळाल्याची पुष्टी केली. तसेच संपूर्ण प्रकरण विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून, संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या जागी परीक्षा देणाऱ्या व्यक्तीविरोधात नियमांनुसार कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात वाढत्या स्पर्धेच्या काळात अशा प्रकारच्या घटना केवळ नियमभंगापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरही अन्याय करणाऱ्या ठरतात. परीक्षा व्यवस्थेतील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अशा गैरप्रकारांवर कठोर आणि तातडीची कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या या प्रकरणाची चर्चा जिल्हभर रंगली असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या घटनेकडे किती गांभीर्याने पाहते आणि दोषींवर कोणती शिस्तभंगतामक कारवाई करते, याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिक्षणाच्या मंदिरात प्रामाणिकतेचा दीप तेवत ठेवण्यासाठी अशा घटनांवर कठोर अंकुश लावणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.









