तपासणी नाक्याअभावी आंतरराज्य पूल अवैध तस्करीसाठी मोकाट

मध्य प्रदेशातून सर्रास आणली जाते देशी विदेशी दारू
बावनथडी नदीवर बांधलेला देवनारा बडपानी पुलावरील प्रकार
दैनिक लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- महाराष्ट्र सीमेलगत मध्यप्रदेशला जोडला गेलेल्या बावनथडी नदी काठावरील देवनारा – बडपानी पुलावर तपासणी नाका बसविण्यात आले नसल्याने मध्यप्रदेशातील गावामधून भरदिवसा सायकल, मोटारसायकल व अन्य वाहनांमध्ये मोहफुलासह, अवैध देशी विदेशी दारू महाराष्ट्रात सर्रास आणली जात आहे.
मात्र याकडे पोलिसांसह, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून तस्करांना अभयदान दिल्या जात आहे.
परप्रांतातून येणाऱ्या देशी-विदेशी दारू व अन्य प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने विविध ठिकाणी असे तपासणी नाके उभारले आहेत. मात्र भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकांवर आदिवासी बहुल देवनारा हे गाव असून या गावाला लागूनच मध्य प्रदेशची सीमा आहे. परंतु महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या पुलावर अद्यापही तपासणी नाका बसविण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र सीमेलगत चिखली देवनारा कुरुमळा डोंगरी बुजरूक आसलपाणी आलेसुर, लेंडेझरी हा क्षेत्र नैसर्गिक वन संपदेने व खनिज संपत्तीने नटलेला आहे. जंगल व्याप्त क्षेत्र असल्याने कोणताही अधिकारी इकडे फिरण्यास तयार नाही. परिणामी मध्य प्रदेशात मिळणारी देशी व विदेशी दारू ही स्वस्त व कमी दरात मिळत असल्याने भर दिवसा मध्यप्रदेशातील दारू महाराष्ट्रात आणली जात आहे. इतकेच नव्हे तर माफक दरात मिळणारा मोहफूल देखील महाराष्ट्रात सर्रास आणले जात असून या ठिकाणी वनविभागाचे तसेच पोलिसांची चौकी नसल्याने तस्करांना अवघे रान मोकळे मिळाले आहे.
‘देवनारा बडपानी हा आंतरराज्यीय पूल जेव्हा पासून बांधण्यात आले तेव्हा पासून येथे तपासणी नाका नाही त्यामुळे महाराष्ट्रात सर्रास मोहफूल, देशी विदेशी दारू, मॅग्निज, डोलामाईट सह वन संपदेची तस्करी सुरू आहे. या पुलावर तपासणी नाका उभारून नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याची गरज आहे.’
— कृष्णकांत बघेल, जि. प. सदस्य भंडारा









