धनाढ्य विरोधी उमेदवार नसल्याने निवडणुकीतील रंगत ओसरली
(काशीनाथ ढोमणे) दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील निवडणुकीतील चुरस अचानक थंडावली आहे. काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड आणि प्रफुल्ल अग्रवाल यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत पूर्णपणे गेली असून मतदारांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. सुरुवातीला काँग्रेसने माजी आमदार दिलीप बनसोड आणि प्रफुल्ल अग्रवाल यांना रिंगणात उतरवले होते.
भाजपकडे या मतदारसंघात स्पष्ट बहुमत असले तरी विरोधक धनाढ्य असल्यास निवडणुकीत काहीही होऊ शकते, अशी चर्चा होती. यामुळे मतदारांचे भावही वधारण्याचीशक्यता वर्तवली जात होती. मात्र, दोन्ही काँग्रेस नेत्यांनी माघार घेतल्याने संपूर्ण चित्रच पालटले आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यासमोर अपक्ष म्हणून नरेश ईश्वरकर आणि भाजपचे भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर उभे आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने आता अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नरेश ईश्वरकर हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले असले तरी भंडारा जिल्हा परिषदेमध्ये पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर पक्षाकडून अपात्रतेची कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनीदिली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सचिन कुंभलकर यांची अपक्ष उमेदवारी हा भाजपने रचलेला डाव आहे. पहिल्या पसंतीची मते अविनाश ब्राह्मणकर यांना मिळतील. मात्र, चुरशीच्या लढतीत दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरतात. अशावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपकडेच राहावीत आणि ती विरोधकांकडे जाऊ नयेत, यासाठी कुंभलकर यांना अपक्ष म्हणून उभे करण्यात आले आहे, अशी चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. दिलीप बनसोड आणि प्रफुल्ल अग्रवाल यांच्या माघारीमुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.निवडणुकीत मोठी लढत होईल, अशी अपेक्षा मतदारांना होती. त्यासाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या मतदारांना, म्हणजेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांना सुरक्षित ठिकाणी, जिल्ह्याबाहेर पाठवले होते. मात्र, आता निवडणुकीतील जोषच निघून गेल्याने आणि निकाल जवळपास निश्चित असल्याचे चित्र निर्माण झाल्याने हे मतदार परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेसने आपले उमेदवार मागे घेऊन अपक्ष नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा दिला असला तरी, ईश्वरकर यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. भाजपकडे संख्याबळ अधिक आहे. अशा स्थितीतकाँग्रेसचा पाठिंबा ईश्वरकर यांना कितपत तारून नेईल, याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, भाजपने आपली रणनीती आखत दोन उमेदवार रिंगणात ठेवून कोणताही धोका पत्करायचा नाही, असे ठरवलेले दिसते.
एकूणच, बनसोड आणि अग्रवाल यांच्या माघारीमुळे निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला निर्माण झालेला राजकीय थरार आता संपला आहे. मतदारांचीही या निवडणुकीतील उत्सुकता मावळली असून, मतदानाच्या दिवशी मतदारांचा प्रतिसाद कसा राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी या मतदारसंघात भाजपचे पारडे जड दिसत असले तरी, शेवटच्या क्षणी कोणतेही राजकीय समीकरण बदलू शकते, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.








