विधान परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर
आ. नाना पटोले यांचा पत्रकारपरिषदेत आरोप
द. लोकजन वृत्तसेवा:भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा वाद आता चांगलाच तापला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच चित्र स्पष्ट झाले असून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, अपक्ष नरेश ईश्वरकर व भाजपचे भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत निवडणूक दबावतंत्राने बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केला आहे.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेला माजी आमदार दिलीप बनसोड, पत्रपरिषदेत आ. नाना पटोले, खा. पडोळे, दिलीप बनसोड, प्रफुल अग्रवाल, ईश्वरकर, जयश्री बोरकर खासदार डॉ. प्रशांत पडोळे, अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रफुल अग्रवाल, मनोज बागडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, ‘विधान परिषदेच्या या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यात सत्तेचा माज चढला आहे. सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढू न देण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत. ३० तारखेला प्रफुल अग्रवाल यांच्या घरी धाड टाकण्यात आली. गोंदिया नगराध्यक्ष शेंडे यांना ईडीची धमकी देण्यात आली. अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना पोलिसांची नोटीस पाठवून त्यांच्या घराला वेढा घालण्यात आला. त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक स्वतः मोहाडी पोलिस ठाण्यात उपस्थित होते. हे सर्व प्रकार निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरू होते.
दबावतंत्राचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. आम्ही या संपूर्ण प्रकाराची तक्रार निवडणूक निरीक्षक, निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. काँग्रेसचे दिलीप बनसोड, प्रफुल अग्रवाल यांनी माघार घेतली असली तरी अपक्ष उमेदवार असलेले नरेश ईश्वरकर यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. आम्ही वर्गणी करून ही निवडणूक लढणार आहोत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुंडाराज संपविण्यासाठी ही निवडणूक लढत आहोत.
नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना भाजपवर निशाणा साधला. ‘सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु जनता सुज्ञ आहे. ती अशा दडपशाहीला बळी पडणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








