लाडकी बहीण योजनेतील १७,१८३ अपात्र लाभार्थी महिलांना पुन्हा न्याय द्या
माजी आमदार चरण वाघमारे यांची मागणी
द. लोकजन वृत्तसेवा:भंडारा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील १७,१८३ महिला लाभार्थींना अपात्र ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांचे मानधन बंद झाले असून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सर्व अपात्र लाभार्थींच्या अर्जांची फेरतपासणी करावी आणि पात्र महिलांना तात्काळ योजनेचा लाभ पुन्हा सुरू करून द्यावा, अशी मागणी तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.
माजी आमदार चरण वाघमारे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. मात्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक त्रुटी, कागदपत्रांतील किरकोळ चुका किंवा माहिती अद्ययावत नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
ज्या महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. तसेच प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पात्र लाभार्थींना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात यावे. त्यांचे बंद झालेले मानधन तात्काळ सुरू करण्यात यावे व थकीत रक्कमही अदा करण्यात यावी.
महिलांच्या हिताशी संबंधित या विषयावर राज्य शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेऊन भंडारा जिल्ह्यातील १७,१८३ महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.









