अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया, २.०८ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त
आठ दिवसात गुटखा, पान मसाला, खाद्यतेल व सुपारीवर कारवाई
द. लोकजन वृत्तसेवा,भंडारा :- अन्न व औषध प्रशासनाने मागील आठ दिवसांत जिल्हाभरात राबविलेल्या धडक मोहिमेत प्रतिबंधित अन्नपदार्थ, संशयित कमी दर्जाची सुपारी, खाद्यतेल तसेच इतर अन्नपदार्थांचा एकूण २ लाख ८ हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे. भेसळयुक्त, कमी दर्जाचे व जनतेच्या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या अन्नपदार्थांविरोधात ही कारवाई करण्यात आली असून विविध ठिकाणी तपासण्या, नमुना संकलन, दंडात्मक कारवाया आणि सुधारणा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) यदुराज दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. प्राप्त तक्रारींची दखल घेत तसेच स्वयंस्फूर्तीने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासण्या केल्या.
भंडारा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत संशयित कमी दर्जाची सुपारी आढळून आली. याप्रकरणी सुमारे ३४ हजार रुपयांचा सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. मोहाडी तालुक्यातील एका दूध व दुधजन्य पदार्थ उत्पादक संस्थेची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी विविध अन्नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.
लाखांदूर येथे एका प्रतिष्ठानाची तपासणी करून खाद्यतेलाचे नमुने संकलित करण्यात आले. तसेच संशयित खाद्यतेलाचा तब्बल १ लाख ५६ हजार ८७० रुपयांचा साठा पुढील आदेशापर्यंत जप्त करून ठेवण्यात आला आहे.
उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आंबा विक्रेत्यांचीही विशेष तपासणी करण्यात आली. घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने अथवा नोंदणी आहे की नाही, विक्रीस्थळाची स्वच्छता, साठवणूक व्यवस्था आणि इतर नियमांचे पालन याची पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील कारवाईदरम्यान तुमसर शहरातील नेहरू नगर परिसरात एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकण्यात आला. तेथे विक्रीसाठी साठवून ठेवलेला गुटखा, पान मसाला तसेच खरा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण १७ हजार १८१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपासासाठी तुमसर पोलिस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.
‘जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोरत कठोर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्री. तुकाराम मुंडे यांनी दिला आहे.








