‘ऑपरेशन नार्कोस’ ची मोठी कारवाई पुरी- गांधीधाम एक्सप्रेसमधून गांजा तस्कर जेरबंद; १.०४ लाखांचा अमली पदार्थ जप्त
द. लोकजन वृत्तसेवा,गोंदिया :- रेल्वे मार्गाचा वापर करून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन नार्कोस’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) पुरी-गांधीधाम एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका संशयित तस्कराला आमगाव रेल्वे स्थानकावर अटक करून त्याच्याकडून २.०९० किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत १ लाख ४ हजार ५०० रुपये असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अमली पदार्थ, मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विभागीय सुरक्षा आयुक्त चेतन दिलीपराव जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ, राज्य पोलिस आणि अन्य कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी आमगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफचे प्रधान आरक्षक राजेश कुमार हे कर्तव्यावर तैनात होते. त्यावेळी गाडी क्रमांक १२९९४ पुरी-गांधीधाम एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दाखल झाली. गाडीतील जनरल डब्यातून एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत प्लास्टिकची पिशवी घेऊन उतरताना त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्याला थांबवून चौकशी करण्यात आली.
चौकशीत संबंधित व्यक्तीने आपले नाव शीतल चिनधालोर, रा. धानोली, ता. आमगाव, जि. गोंदिया असे सांगितले. त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गांजासदृश वास येणारी दोन पाकिटे आढळून आली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन आवश्यक पंचनामा व तपासणी प्रक्रिया राबविण्यात आली.
सविस्तर तपासणीत आरोपीच्या ताब्यातून एकूण २.०९० किलो गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थांच्या बाजारमूल्याच्या आधारे अंदाजित किंमत १ लाख ४ हजार ५०० रुपये असल्याचे स्पष्ट झाले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी जीआरपी गोंदिया यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, जीआरपीने आरोपीविरुद्ध अमली पदार्थ व मनःप्रभावी द्रव्ये प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपीकडे गांजा कुठून आला, तो कोणाला पुरवठा केला जाणार होता आणि या तस्करीमागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्या किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू अथवा हालचाल आढळल्यास तत्काल आरपीएफ, रेल्वे कर्मचारी किंवा हेल्पलाइन क्रमांक १३९ वर माहिती द्यावी. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अशा गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.








