जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ; बहिष्कार कायम

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- केंद्र सरकारने आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र कॉलम ठेवला नसल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ओबीसी संघटनांच्या साखळी उपोषणाचा आज २४ वा दिवस पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे प्रशासनासोबत झालेली महत्त्वपूर्ण बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली असून, ओबीसी संघटनांनी जनगणनेवरील आपल्या बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे.

आज पार पडलेल्याउच्चस्तरीय बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात जनगणनेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. म्हणूनच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उपोषण मागे घेण्याची आणि गावागावातजनगणनेचे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली.

प्रशासन म्हणत आहे की ओबीसींची गणना पुढच्या टप्प्यात होईल, परंतु यावर ओबीसी संघटनांचा अजिबात विश्वास नाही. या आंदोलनाला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सरपंच संघटनांनी अधिकृत पाठिंबा दिला आहे. उपविभागीय कार्यालयातझालेल्या बैठकीत जवळपास ३०० ग्रामपंचायतींच्या सरपंच, प्रशासक आणि नागरिकांनी एकमुखाने निर्णय घेतला की, जर ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल, तर संपूर्ण गावातून ग्रामसभेच्या माध्यमातून जनगणनेवर पूर्णपणे बहिष्कार टाकला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *