साकोली वनपरिक्षेत्रात बिबट्याची सुखरूप सुटका
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- साकोली वनपरिक्षेत्रातील नितवक्षेत्र सावरबंध येथील मौजा वळद गावात शेतकऱ्याच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याची वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमने यशस्वी सुटका केली. मंगळवार, ३ जून २०२६ रोजी ही घटना घडली. बिबट पूर्णपणे सुदृढ असल्याने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, वळद येथील शेतकरी भोजराज भिवा बनकर यांच्या शेतीला लागून असलेल्या दुर्गाबाई ढोब नरह्याच्या खाली असलेल्या पाण्याच्या पाइपमध्ये वन्यप्राणी बिबट लपून बसल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच सौ. माधवी बडवाईक यांनी सावरबंध बिटाचे वनरक्षक कु. पी. आर. अंबुले यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, साकोली आपल्या अधिकारीकर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांना जमाव न करण्याच्या सूचना दिल्या. बिबट मानवी वस्तीजवळ असल्याने धोका टाळण्यासाठी “शिप्रा कृती दल’ वन्यप्राणी बचाव दल, साकोली यांना पाचारण करण्यात आले.
पथकाने पाहणी करून पाइपच्या एका बाजूने पिंजरा लावत बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी, एनएनटीआर येथील यशराज तुलावी यांनी बिबट्याची तपासणी केली. बिबट (मादी) शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सुदृढ असल्याचा अहवाल दिल्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.सदर बचावकार्य उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग भंडारा व सहायक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आर. कटरे, क्षेत्र सहाय्यक के. एस. शिवनकर, उमरी, ए. बी. तुरकर बी. आर. गोंडउमरी, जी. एन. पाथरमांड बी. आर. उमरी, एस. जी. खंडागळे बी. आर. पाथरी, एस. एन. मेश्राम बी. आर. महालगाव व ठठढ टीम साकोली यांनी गावकरी, सरपंच व पोलीस पाटील यांच्या मदतीने पार पाडले. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वनविभागास सहकार्य करावे.








