शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ
मुंबई:- राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत २ जून रोजी मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत २ जून रोजी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात आला असून विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने लगेच घोषणा होणार नाही, असेही सांगण्यात आलं आहे. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढणार आहे. मात्र, ५६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना जून महिन्यात गुडन्यूज मिळेल, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जून महिन्यात घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
त्यानुसार, २ जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला असून सहकार विभागाकडून अटी व शर्तीनंतर कर्जमाफी केली जाणार आहे. दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अनेकशेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर २ जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर २ जून रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेस मान्यता देण्यात आली. त्यानुसार, दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे. तर नियमित पिक कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.









