वाशिमच्या चमुने केले बेला, खरबी व खैरी वलमाझरी ग्रामपंचायतचे मूल्यांकन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ नियुक्त करण्यात आलेल्या विशेष मूल्यांकन पथकाने १ जुन रोजी भंडारा पंचायत समिती अंतर्गतच्या बेला व खरबी गावाला भेट देऊन येथील विकासकामांची आणि प्रशासकीय पारदर्शकतेची कडक तपासणी केली. या टीमने केवळ कागदपत्रांचीच नव्हे, तर आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, डिजिटल सुविधा आणि महिला व बालविकास विभागांतर्गत सुरू असलेल्या प्रत्यक्ष कामांची “ऑन ग्राउंड’ पाहणी केली.

बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच. शारदा शेंडे, यांनी पथकासमोर गावाच्या प्रगतीचा पाढा वाचला.केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता, ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून गावाने स्वच्छता, दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये कशी झेप घेतली, याचे सादरीकरण त्यांनी केले. यावेळी भंडारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद हुमने, विस्तार अधिकारी प्रमोद तिडके, ग्राम पंचायत अधिकारी विलास खोब्रागडे, उपसरपंच अर्चना कांबळे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका आखरे, आरोग्य सेविका वैशाली ठवकर, मुख्याध्यापक महेंद्र केंद्रे, अंगणवाडी सेविका मंदा बोरकर, आशा सेविका वनीता तितरमारे, कृषी सहाय्यक प्रविण पडघान यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या या दौऱ्यामुळे बेला ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *