तुमसर आरटीई घोटाळा: बोगस प्रवेशांची चौकशी न केल्याने शिक्षणाधिकारी रडारवर
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- “सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी’ येथील आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र एल्गार पुकारला आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्रे सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला. तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून १५ दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्याने, तुमसरच्या गट शिक्षणाधिकारी अर्चना माटे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी आता जोर धरू लागली आहे.
तक्रारदार पालक पुरुषोत्तम ढबाले (रा. चारगाव, ता. तुमसर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगाअनविक ढबाले याचा आरटीई अंतर्गत मिळालेला हक्काचा प्रवेश नियमबाह्य ठरवून रद्द करण्यात आला. मात्र, दुसरीकडे अनेक धनदांडग्या विद्यार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे याच शाळेत प्रवेश मिळवला. या बोगस प्रवेशांविषयी संपूर्ण पुराव्यांसह १५ मे २०२६ रोजी गट शिक्षणाधिकारी (पंचायत समिती, तुमसर) यांच्याकडे रीतसर आक्षेप पत्र नोंदवण्यात आले होते. मात्र, १५ दिवस उलटूनही कोणतीही प्राथमिक चौकशी करण्यात आली नाही. अधिकाऱ्यांच्या यानिष्क्रियतेमुळे या प्रकरणात मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त केला जात आहे.









