टिप्परद्वारे रेतीची अवैध वाहतूक; ३० लाखांचा टिप्पर व रेती जप्त
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोराः- वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकावर करडी पोलिसांनी धडक कारवाई करत ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ३० मे २०२६ रोजी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास ठाणेदार सपोनि नांगलोत यांना गोपनीय माहिती मिळाली की, तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथील वैनगंगा नदीपात्रातून एक टिप्पर अवैध रेती भरून देव्हाळा मार्गे तिरोड्याच्या दिशेने जाणार आहे. माहिती मिळताच ठाणेदार नांगलोत यांनी पो.शि. समीर मेश्राम, पो.शि. काळसर्पे व चालक पो.हवा. कावळे यांच्यासह नायरा पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. सापळ्यादरम्यान संशयित टिप्पर अडवून चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव कैलास हरगु निशाने वय ३४ वर्ष रा.नवेगाव ता. तिरोडा जि. गोंदिया असे सांगितले.
रेती वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती त्याच्याकडे नव्हती. घाटकुरोडा येथील वैनगंगा नदीपात्रातून अवैधपणे रेती भरून वाहतूक करीत असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून अशोक लेलँड कंपनीचा दहा चाकी टिप्पर क्र. एमएच ३६ एए २८४५ किमंत ३० लाख रुपये व ५ ब्रास रेती किमंत ३० हजार रुपये असा एकूण ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक कैलास निशाने याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ठाणेदार गौरक्षनाथ नांगलोत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध अशाच कारवाया सुरू राहतील. असे पोलिसांनी स्पष्ट केले.









